Quick Reads

पाकिस्तानच्या सैन्याविरोधात सामान्य जनतेचा प्रक्षोभ

अशी घटना पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीच घडली नव्हती.

Credit : Indie Journal

 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी (मंगळवार) इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करत पाकिस्तानमध्ये सध्या सत्तेत असलेल्या सरकार आणि पाकिस्तानी सैन्याविरोधात घोषणाबाजी केली आणि अनेक सैन्य ठिकाणं आणि राजकीय नेत्यांच्या आवासांची तोडफोड केली. या आंदोलनादरम्यानचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेचा पाकिस्तान सैन्याविरोधातला आक्रोश. 

 

पाकिस्तान आणि सैन्य

पाकिस्तानमध्ये सैन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाकिस्तानच्या सैन्याचं देशातील महत्त्व अधोरेखित करताना अनेक टीकाकार म्हणतात की जगात इतर देशांकडे सैन्य असतं, मात्र पाकिस्तानमध्ये सैन्याकडे देश आहे. त्याला कारण म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला पाकिस्तान सैन्यबळाच्या बाबतीत मात्र जगातील ७वा सर्वात शक्तिशाली देश मानला जातो. 

जर पाकिस्तानच्या मागासलेपणाचं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नाच्या दोन तृतियांश सकल उत्पन्न असणाऱ्या पाकिस्तानची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. तरीसुद्धा पाकिस्ताननं भारताच्या एकूण सैनिकाच्या निम्म्या संख्येनं सैनिक भरती केलेले आहेत. 

पाकिस्ताननं गेल्या पाच वर्षात त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४ ते ४.५ टक्के रक्कम सैन्यावर खर्च केली. बऱ्याच जाणकारांच्या मते हा खर्च फक्त दाखवण्यापुरता असून खरी रक्कम याहून खूप जास्त आहे. भारतात हेच प्रमाण २ टक्क्यांच्या आसपास आहे. 

 

पाकिस्तानी सैन्याचं सामाजिक आणि राजकीय स्थान 

तरीही हा खर्च पाकिस्तान स्वखुशीनं करतो. त्याला कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये सैन्याला असणार स्थान. पाकिस्तानच्या निर्मितीपासून पाकिस्तानी सैन्यानं भारताविरोधात केलेल्या प्रचारामुळं आणि काश्मीर मुद्द्याला दिलेल्या महत्त्वामुळं त्यांचं पाकिस्तानी नागरिकांच्या मनात एक अढळ महत्त्व निर्माण केलं. त्यामुळं पाकिस्तानी जनतेला भारतविरोधी भावना आणि काश्मीरी नागरिकांबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळं पाकिस्तानची जनता हालअपेष्टा सहन करत पाकिस्तानच्या सैन्याचं लालन पालन करत आली.  

त्यांच्या पाकिस्तानच्या समाजमनावर असलेल्या प्रभावामुळं पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वानं कधीच पाकिस्तानी सैन्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. गेल्या ७४ वर्षात पाकिस्तानमध्ये एकाही पंतप्रधानाने त्याचा पाच वर्षचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. पाकिस्तानच्या ७४ वर्षाच्या अस्तित्वापैकी एकूण ३३ वर्ष पाकिस्तानी सैन्यानं प्रत्यक्षरित्या राज्य केलं. तर आजही पाकिस्तानी सैन्याच्या परवानगी शिवाय या देशात कोणीही नेता होऊ शकत नाही आणि झालाच तर टिकू शकत नाही असं म्हणायला वाव आहे. 

सध्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांना पाकिस्तानच्या सैन्यानं फाशी दिली होती तर आई बेनझीर भुट्टो यांची हत्या तत्कालीन आर्मी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी घडवून आणल्याचं मानलं जात. याशिवाय अनेक राजकारण्यांची आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या पाकिस्तानच्या सैन्यानं घडवून आणल्याचं मानलं जात.  

त्यामुळं पाकिस्तानमध्ये सैन्याविरोधात जाण्याची हिंमत राजकीय नेतृत्व करत नाही. पाकिस्तानमध्ये कोणाची सत्ता येणार, ती किती दिवस चालणार, त्यात काय निर्णय घेतले जाणार किंवा नाहीत याचा निर्णय पाकिस्तानी सैन्य घेतं. पाकिस्तानची राजकीय राजधानी जरी इस्लामाबाद असली तरी खरी सत्ता मात्र रावलपिंडीमधल्या सैन्य मुख्यालयात केंद्रित आहे, असा समज होऊ शकतो. 

 

इम्रान खान आणि सैन्याचा वाद 

या मुख्यालयाच्या कृपेनं पाकिस्तानचे माजी क्रिकेटपट्टू इम्रान खान ऑगस्ट २०१८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. मात्र पाकिस्तानी सैन्य आणि इम्रान खान यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळं एप्रिल २०२२ मध्ये त्यांचा सत्तापालट झाला. तेव्हापासून इम्रान खान यांनी पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय विरोधात सातत्यानं व्यक्तव्य करत आहेत. 

इम्रान खान यांनी पाकिस्तानी सैन्यावर त्यांचं सरकार पाडण्याचा, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा, त्यांच्याविरोधात खोटे खटले दाखल करण्याचं आणि त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. यातून खान आणि पाकिस्तानी सैन्य व सरकारमधील वाद विकोपाला गेला असून पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. इम्रान खान यांना मंगळवारी झालेल्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात घोषणाबाजी करून पाकिस्तानच्या मुख्यालयासह अनेक सैन्य स्मारकांची तोडफोड केली. 

 

पाकिस्तान सैन्याच्या विरोधात उठलेलं वादळ 

१९७१ च्या युद्धात झालेला पराभव सोडता पाकिस्तानच्या सैन्याला पाकिस्तानी जनतेचा रोष सहन करावा लागला नाही. १९७१ च्या पराभवानंतरही काहीच काळात पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांची पाकिस्तानच्या समाजमनातील स्थान परत मिळवलं. मात्र, त्यावेळी ही पाकिस्तानच्या सैन्याला या प्रकारचा विरोध सहन करावा लागला नाही. गेल्या आठवड्यात खान यांच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनात पाकिस्तानची जनता ' ये जो दहशतगर्दी हैं, उसके पिछे वर्दी है', अमेरिकाने कुत्ते पाले, वर्दीवाले वर्दीवाले' ते 'आझादी' सारख्या घोषणा देतेय. 

इम्रान खान यांच्या समर्थकांनी लाहोरमधील सैन्य मुख्यालय आणि गव्हर्नर हाऊस, पेशवारमधील आर्मी कोर कमांडरचं घर, पंजाब मधील रिजिमेंट सेन्टर, मियाँवाली मधील वायुसेना तळ, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचं घर, बन्नू सैन्य छावणी आणि अनेक महत्त्वाची सैन्य ठिकाणं पेटवली. तसंच अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करण्यात आलं. अशी घटना पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीच घडली नव्हती. 

 

पाकिस्तानचं १९७१ चं युद्ध आणि पाकिस्तानी सैन्याची टीका 

पाकिस्तानचा १९७१ चा भारताविरोधातला पराभव आणि बांग्लादेशच्या नागरिकांवर झालेल्या अत्याचारांसाठी पाकिस्तानच्या सैन्याला इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांकडून जाब विचारला जातोय. एवढंच नव्हे तर पाकिस्तानच्या जनतेकडून पाकिस्तानी सैन्याच्या १९७१ च्या युद्धातील पराभवा वेळेच्या छायाचित्रांना सुद्धा प्रसारित करण्यात येत आहे. 

 

 

यात पाकिस्तानच्या तत्कालीन लेफ्टिनंट जनरल ए.के नियाझीच्या तहाच्या करारावर सही करतानाच्या फोटोंचा विशेष वापर केला जातोय. स्वतः इम्रान खान यांनी या युद्धाला आणि या युद्धातील पराभवाला पाकिस्तानच्या सैन्याला जबाबदार धरलं. तर तत्कालीन पूर्व पाकिस्तान आणि नंतरच्या बांगलादेशचे नेते शेख मुजीबूर रहमान यांच्याबरोबर स्वतः ची तुलना सुद्धा केली. विशेष म्हणजे १९७१ साली झालेल्या निवडणुकांनंतर जनमताचा आदर न केल्यामुळं आणि पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांवर केलेल्या अत्याचारांमुळं बांगलादेशची निर्मिती झाल्याची कबुली सुद्धा इम्रान खान यांनी दिली. 

 

याचं भारतासाठी महत्त्व काय?

पाकिस्तानच्या समाजमनावर पाकिस्तानी सैन्याचा प्रभाव टिकून राहावा म्हणून पाकिस्तानी सैन्याकडून भारताविरोधात विष पेरण्यात आलं. शिवाय सैन्याकडे असलेल्या शक्ती दहशतवाद, फुटीरतावाद आणि अंमली पदार्थांचा पुरवठा इत्यादीचा वापर करून भारताविरोधात कटकारस्थानं करत राहिले. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, जर पाकिस्तान त्यांच्या सैन्यावर होणारा अतिरेकी खर्च आणि त्यांना असलेली अवास्तव ताकद कमी झाली तरी भारताला तात्पुरता का होईना पण दिलासा मिळू शकतो. 

तर देशातील गोंधळापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि संपूर्ण देशाला राष्ट्रवादाच्या छत्री खाली एकत्र करण्यासाठी भारताविरोधात लष्करी कारवाई करू शकतं असं काही जाणकारांना वाटत. त्यामुळं भारत सरकार घटनांवर लक्ष ठेऊन आहे.