India

मोहोळ, धंगेकर यांच्या अनुपस्थितीमुळं संवाद सभेला आलेल्या पुणेकरांची नाराजी

वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे कार्यक्रमाला उपस्थित.

Credit : इंडी जर्नल

 

लोकसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळावी म्हणून 'परिवर्तन' संस्थेकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील तीन महत्त्वाच्या उमेदवारांना 'पुणे जनसंसद' या कार्यक्रमात चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवल्यानं कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराच्या पदयात्रा लांबल्यानं कार्यक्रमाला येऊ न शकल्याचं कारण दिलं. मात्र या दोन उमेदवारांची अनुपस्थिती त्यांची पुण्याच्या मतदारांबद्दल असलेली उदासिनता दर्शवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

परिवर्तन या संस्थेकडून पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तीन मुख्य उमेदवारांना नागरिकांसोबत चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, काँग्रेस उमेदवार आणि कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश होता. तर अपक्ष उमेदवार कर्नल (निवृत्त) सुनिल पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

"मतदान करण्यापूर्वी नागरिकांनी त्यांच्या उमेदवारांना जाणून घेतलं पाहिजे, त्यांची भुमिका, धोरणं काय आहेत, ते खासदार म्हणून पुण्यासाठी काय काम करणार आहेत हे समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सर्व महत्त्वाच्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी त्यांची वेळ घेण्यात आली होती. मात्र सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि विरोधी पक्षाचे उमेदवार रवींद्र या कार्यक्रमाला ऐनवेळी उपस्थित राहिले नाहीत. मात्र इतर दोन उमेदवार या कार्यक्रमासाठी आले होते आणि नागरिकांना त्यांची भुमिका जाणून घेता आली," परिवर्तनचे इंद्रनिल सदलगे सांगतात.

या कार्यक्रमासाठी खुप आधीपासूनच सर्व उमेदवारांची वेळ घेण्यात आली होती, मात्र उमेदवारांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली. तरी भाजपकडून उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काही कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि उमेदवार आणि पक्षाच्या बाजूनं भुमिका मांडण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र कार्यक्रम फक्त उमेदवारांसाठी आहे सांगत त्यांना थांबवण्यात आलं.

 

 

या कार्यक्रमासाठी आलेले वसंत मोरे यांनी आयोजकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भुमिका मांडली. शिवाय पुण्याला भेडसावत असलेल्या विविध प्रश्नांवर ते खासदार झाल्यास काय उपाय करतील याबद्दलही माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांची अनुपस्थित राहिल्याबद्दल टीका केली.

"ते दोघं येऊही शकत नाहीत. मला वाटतं त्यासाठी (चर्चेला उपस्थित पाहण्यासाठी) शहराच्या विकासाची भुमिका मांडता आली पाहिजे. यांनी कधी शहराचा विकासाच्या भुमिका मांडल्या नाहीत. एक महापौर होते, तेसुद्धा त्यांच्या प्रभागात होते. आमदार झाले ते दुसरे, तेपण त्यांच्याच प्रभागात होते. मला वाटतं की अशा महत्त्वाच्या ठिकाणी येऊन काय भुमिका मांडणार हे त्यांना कळत नाही, म्हणून ते अशी ठिकाणं टाळतात," इतर दोन उमेदवार कार्यक्रमाला का उपस्थित नव्हते असं विचारलं असता वसंत मोरे म्हणाले.

या संदर्भात धंगेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची विश्रामवाडीतील पदयात्रा लांबल्यानं त्यांना या चर्चासत्रात सहभागी होता आलं नाही, असं स्पष्टीकरण त्यांचे स्वीयसहायक दत्ता झगडे यांनी दिलं. तर भाजपचे माध्यम संपर्क प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळदेखील पदयात्रेत व्यस्त असल्यानं त्यांना ऐनवेळी या चर्चासत्रात सहभागी होता आलं नाही.

याआधी दोनवेळा या तिन्ही उमेदवारांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आहेत आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यातील एक कार्यक्रम पुण्याच्या पत्रकारसंघामध्ये झाला होता.

मात्र त्यावेळी सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न उपस्थित करता आले नव्हते. आज झालेल्या चर्चेत खासदाराला लोकसभेत असणाऱ्या जबाबदाऱ्या, पुण्यासमोर असलेल्या पाणी, वातावरण, सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि वाहतूककोंडी सारख्या प्रश्नांवर नागरिकांनी उमेदवारांची भुमिका जाणूण घेतली. तर समान नागरी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यासारख्या प्रश्नांवर पक्ष आणि नेते म्हणून उमेदवार कसं पाहतात, हे नागरिकांनी जाणून घेतलं.

"हा एक चांगला प्रयत्न होता या कार्यक्रमातून आम्हाला आमच्या मतदार संघातील उमेदवाराला भेटण्याची संधी मिळाली असती, पण यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार ज्यांनी खरं तर जनतेला भेटायला हवं. लोकांशी भेटून त्यांचा शहराप्रतीचा संकल्प सांगायचा होता, पण त्यांनी ते केलं नाही हे खुप दुःखदायक होतं," चर्चेला उपस्थित हेमा चारी सांगतात. या कार्यक्रमाला बरेच नागरिक उपस्थित होते. मात्र या दोन नेत्यांनी कार्यक्रमाला येणं टाळल्यानं उपस्थित सर्वच नागरिक नाराज झाले.

 

 

"या चर्चेसाठी हे दोन्ही (मोहोळ आणि धंगेकर) उमेदवार पाहिजे होते. ते नसल्यामुळे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण खासदार म्हणून जे प्रश्न विचारणार होतो, त्यावर त्यांची भुमिका कळाली नाही. हे प्रश्न त्यांच्यासाठी तयार करण्यात आले होते, कारण त्यांच्यातील एक सत्ताधारी पक्षाचे आहेत तर दुसरे विरोधी पक्षाचे आहेत. इतर दोन उमेदवार जे होते त्यांच्यातील एक नगरसेवक होते, त्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची माहिती नव्हती. तर दुसरे निवृत्त सैन्य अधिकारी होते, त्यांना राजकारणाचा काही अनुभव नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्य हेतू साध्य झाला नाही," एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतरही अपेक्षाभंग झाल्याचं यतिश देवाडीगा सांगतात.

"तीन मुख्य उमेदवारांपैकी दोघं चर्चेला उपस्थित राहिले नाही. हे दर्शवतं की ते नागरिकांच्या मतांना आणि वेळेला किती महत्त्व देतात. जे आले होते, ते मुख्य पक्षाचे उमेदवार नव्हते. त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांशी मी असहमत आहे तर त्यांनी मांडलेले काही मुद्दे खुप चांगले होते. विशेषतः पर्यावरण, टेकडी, नदी आणि पाणी या मुद्द्यांवर मी सहमत आहे," विजया सुरतकरही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

"पण त्या व्यतिरिक्त ही एक वेळ वाया घालवणारी चर्चा होती. यातून कोणत्या उमेदवाराबद्दल आमची मतं बनली नाहीत. जर इतर दोन उमेदवार इथं आले असते तर या चर्चेचा नक्कीच फायदा झाला असता, पण ते आले नाहीत यावरून कळतं की ते या शहराच्या जनतेबद्दल अजिबात सहानुभुती ठेवत नाहीत," सुरतकर पूढं सांगतात.

"ते जर इथं आले असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली असती तर त्यातून मला नक्की कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याचा अंदाज आला असता. यातून विविध प्रश्नांवर त्यांच्या पक्षाची आणि त्यांची काय भुमिका आहे ते कळलं असतं त्याच्यावरून माझं मत ठरलं असतं. इथं विचारले जाणारे प्रश्न अवघड होते, एका राष्ट्रीय पातळीच्या उमेदवाराला विचारले जाणारे प्रश्न होते, त्यांना त्या प्रश्नांवर उत्तर द्यायचं नसेल म्हणूण ते आले नाहीत, असं मला वाटत," देवाडीगा पुढं म्हणाले.

अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांत निवडणुका सुरु झाल्यानंतर उमेदवार एकमेकांसमोर येऊन चर्चा आणि वादविवाद त्यातून त्या उमेदवारांची मतं, धोरणं आणि विचारसरणी याबद्दल तिथल्या मतदारांना कळतात. त्यातून कोणत्या मतदाराला मतं देणं योग्य ठरेल हे तिथल्या मतदाराला ठरवता येतं. पुण्यातील तीन उमेदवारांनी याआधी दोन वेळा एकत्र येऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नसल्यानं पुण्यातील नागरिकांना या प्रकारचे वादविवाद पाहून त्यांचा उमेदवार नेमता येईल अशी निर्माण झालेली शक्यता फक्त शक्यताच राहिली.