Quick Reads

मणिपूरच्या भाषणात मोदींच इंडियावर लक्ष

सरकारविरोधात आलेल्या अविश्वास ठरावांबाबत बोलताना २०२९ पर्यंत तेच पंतप्रधान राहणार असल्याचंही त्यांनी सुचवलं.

Credit : इंडी जर्नल

 

संसदेच्या पावसाळी अधिवेशन संपायच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर बोलले. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या भाषणात ते बराच वेळ त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर बोलले, विरोधी पक्षांवर टीका केली, आणि त्यात नंतर मणिपूरचा उल्लेख केला. विरोधी पक्षाला मणिपूरबद्दल काहीही सहानुभूती नसून ते या विषयावर ते फक्त राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. तसंच त्यांच्या सरकारविरोधात आलेल्या अविश्वास ठरावांबाबत बोलताना २०२९ पर्यंत तेच पंतप्रधान राहणार असल्याचंही त्यांनी सुचवलं.

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात त्यांच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाबद्दल विरोधी पक्षाचे आभार मानून केली. "देव त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाला ना कोणाला निवडत असतो. देवाची इच्छा होती की माझ्या सरकारवरचा देशाचा विश्वास दृढ व्हावा. म्हणून देवानं विरोधीपक्षाला अविश्वास ठराव मांडायला लावला," असं मोदी म्हणाले. याशिवाय त्यांनी विरोधीपक्षाला २०१८ मधील अविश्वास प्रस्ताव आणि त्याचा भाजपला झालेल्या फायद्याची आठवण करून दिली. 

भाषणादरम्यान त्यांनी विरोधी पक्षांच्या सभागृहातील वर्तनावर टीका केली. एकीकडे सभागृहात महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना विरोधी पक्ष सभागृहात गोंधळ घालत होते, या विधेयकांवर होणाऱ्या चर्चेत सहभागी होत नव्हते, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विरोधी पक्षांना गरिबांच्या भुकेची किंवा तरुणांच्या भविष्याची चिंता नसून फक्त सत्तेच्या भुकेची आणि राजकीय भविष्याची चिंता असते, असा आरोप त्यांनी केला. 

त्यानंतर नेहमीप्रमाणे काँग्रेसमधील घराणेशाही आणि गांधी कुटुंबावर त्यांनी हल्ला केला. काँग्रेसमध्ये फक्त दरबारात हाजी हाजी करणाऱ्या लोकांना स्थान असून जमिनीतून स्वकर्तृत्वावर पुढं आलेल्या लोकांना तिथं काहीही स्थान नसल्याच मोदी म्हणाले. त्यांनी हे आरोप करताना अनेक दुर्लक्षित काँग्रेस नेत्यांची नावं घेतली. त्यात सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री आणि पी व्ही नरसिम्हाराव यांची नावं नेहमीप्रमाणे घेण्यात आली. या नेत्यांना एनडीए सरकारनं न्याय दिला असल्याचं मोदी म्हणाले.

 

 

 

पुढं त्यांनी विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीवरून टोमणे मारले. नव्यानं उभारलेली I.N.D.I.A. आघाडी म्हणजे लग्नाची वरात असून त्यात सगळेच नवरे बनून पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली. शिवाय या नव्या INDIA आघाडीचा पायासुद्धा एनडीए असून त्यात त्यांनी फक्त दोन अहंकाराचे आय (I) घातले असल्याचं मोदी म्हणाले. एक २६ पक्षांचा आणि दुसरा एका घराण्याचा (म्हणजे गांधी कुटुंबाचा). 

त्यांनी राहूल गांधींवर सुरुवातीला नाव न घेता टीका केली. काँग्रेस गेली कित्येक वर्ष न चालणार उत्पादन पुन्हा पुन्हा बाजारात आणून विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोमणा त्यांनी राहुल गांधींना मारला. पुढं त्यांनी राहूल गांधींवर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी त्यांच्या लोकसभेतील कालच्या भाषणातील संदर्भ घेतला. राहुल गांधी यांनी लंका दहनाची कथा बरोबर वापरली असली तरी त्यांचं उदाहरण चुकलं असल्याचं मोदी म्हणाले. रावणाच्या अहंकारामुळं ज्याप्रमाणे लंका जळाली त्याप्रमाणे एका कुटुंबाच्या अहंकारामुळे काँग्रेस पक्ष ४०० हुन ४० वर आला असल्याचं मोदी म्हणाले. 

राहुल गांधींच्या मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली असल्याच्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. भारत माता म्हणजे राहुल गांधींसाठी सत्ता सुखाचा मार्ग आहे आणि भारत मातेच्या, संविधानाच्या आणि लोकतंत्राच्या हत्येची त्यांची इच्छा राहुल यांच्या वक्तव्यातून दिसून येते, असा गंभीर आरोप मोदींनी केला. 

त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाकडून सातत्यानं त्यांना मणिपूर विषयावर बोलण्याचं आवाहन केलं, अगदी घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र मोदींनी विरोधी पक्षांच्या मागण्यांकडे बराच वेळ दुर्लक्ष केलं. शेवटी विरोधी पक्षानं सभात्याग केल्यानंतर पंतप्रधान मणिपूरच्या परिस्थितीवर बोलले. याबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर वक्तव्य केलं असल्याचा उल्लेख मोदींनी केला. 

मणिपूरवर बोलताना मोदींनी एकूण हिंसेमागच्या पार्श्वभूमीचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तिथं घडलेल्या एकूण प्रकाराबद्दल दुःखी असून लोकांना, पीडितांना न्याय, आरोपींना शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. 

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसकडून ईशान्येच्या राज्यांना हाताळताना झालेल्या चुकांची आठवण करून दिली. यात त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आसामच्या लोकांना १९६२ च्या युद्धावेळी दिलेल्या रेडिओ भाषणाचा, इंदिरा गांधी यांनी मिझोराम इथं वायुसेनेनं केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी ईशान्येच्या राज्यातील फुटीरतावादाला काँग्रेसची मनोवृत्ती जबाबदार असल्याचं म्हटलं.

 

 

मोदींनी काँग्रेसवर याशिवायही बरेच आरोप केले. त्यात भारत तेरे तुकडे होंगे सारख्या घोषणा देणाऱ्या लोकांना, सिलिगुडी कॉरिडॉर बंद करण्याची भाषा करणाऱ्या लोकांना आणि वंदे मातरम न बोलणाऱ्या लोकांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेवटी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास व्यक्त करत, विरोधी पक्ष असाच एक अविश्वास ठराव २०२८ मध्ये मांडतील, असं भाष्य केलं. भाजपमध्ये  वयाच्या ७५व्या वर्षी नेत्यांना निवृत्त करण्याचा पायंडा मोदी आणि शहांच्या जोडीनं घातला होता. मात्र या नियमाला बाजूला ठेऊन सध्या ७२ वर्षीय असलेले मोदी २०२९ पर्यंत, म्हणजे वयाच्या ७८ वर्षांपर्यंत पंतप्रधान राहणार असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवलं आहे. 

मोदींच्या भाषणानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार अधिरंजन चौधरी यांच्या विरोधात तक्रार करत हक्कभंग समितीकडून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सदनातून निलंबित करण्यात यावं, असंही ते म्हणाले.

मोदी यांच्या भाषणानंतर अविश्वास ठरावावर आवाजी मतदान होऊन ठराव पराभूत झाला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोही यांनी काँग्रेस खासदार व विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तक्रार करत त्यांच्या वर्तनाची चौकशी हक्कभंग समितीकडून करण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचसोबत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चौधरी यांना सदनातून निलंबित करावं, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजुरी देऊन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारला.