India

विदर्भाच्या काही भागात आवर्षण, काही भागात पूर!

जुलैमधील पूर, ऑगस्ट महिन्यातील आवर्षण आणि सप्टेंबरमधील ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना फटका.

Credit : इंडी जर्नल

 

विदर्भातील शेतकऱ्यांना यावर्षी लांबलेलं मान्सूनचं आगमन, जुलै महिन्यात जोरदार पावसामुळं आलेला पूर, ऑगस्ट महिन्यातील आवर्षण आणि सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरणामुळे पिकावर पडलेली बुरशी अशा अनेक संकटांचा सामना यावर्षी करावा लागत आहे. शिवाय तिथले शेतकरी रानटी प्राण्यांच्या त्रासाला वैतागले आहेत. घटतं उत्पादन, कमी झालेला बाजारभाव आणि पाण्याच्या कमतरतेमुळे आधीपासूनच त्रस्त असलेल्या इथल्या शेतकऱ्यांना यावर्षी पुरानंही मोठा धक्का दिला. विदर्भातील स्थिती इतकी विचित्र आहे की जिल्ह्याच्या एका तालुक्यात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत मागण्याची वेळ आली आहे. तर दुसऱ्या तालुक्यात पुरामुळे वाया गेलेल्या पिकांसाठी भरपाई मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानंतर बिपॉरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात मौसमी वाऱ्यांचं आगमन लांबलं. त्यात जुलै महिन्यात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांत झालेला पाऊस सोडता महाराष्ट्रात विशेष पाऊस झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्याचवेळी विदर्भात जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी विदर्भात पुरेसा पाऊस झाला असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र खरी परिस्थिती अतिशय वेगळी आहे.

"सध्या पाणी (पाऊस) रोजचं येत आहे. आभाळी वातावरण आहे, पण जसा पाहिजे तसा पाणी येत नाहीये. आम्ही आमच्या शेतात कपाशी (कापूस) आणि सोयाबीनची लागवड केली आहे. पाऊस नसल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा गळाल्या आहेत, जून महिन्यात पाऊस आला नाही, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता आणि त्यामुळे पिकाला धोका निर्माण झाला. ऑगस्ट महिन्यात आम्ही पावसाची आतुरतेनं वाट पाहत होतो, पण ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही," वर्ध्यातील इसापूरचे शेतकरी विनय महाजन सांगतात.

"ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला फुलोरा आला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची फुल गळायला लागल्यानंतर पाऊस आला. त्यातही सुरुवातीचे दोन-तीन दिवस पाऊस राहिला, मात्र तेव्हापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळं ऊन पडलं नाही आणि पिकावर बुरशी आली," महाजन पुढं सांगतात.

 

 

तर यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे त्यांच्या निम्म्या पिकाचं नुकसान झालं, अशी माहिती वाशिमच्या मनोरा तालुक्यातील शेतकरी पंजाबराव वाघमारे देतात.

"मी नदीकाठच्या माझ्या आठ एकर शेतात पराटी (कापूस) आणि तीन एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तुरीचं पीक घेतलं होतं. पण जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकाचं नुकसान झालं. जुलै महिन्यात आलेल्या पावसानं नदीला पूर येऊन पिकाची अर्ध्याला अर्धी हानी झाली," वाघमारे सांगतात. सध्या पाऊस पडत नसल्यानं ते विहिरीच्या पाण्याचा वापर करून शेताला पाणी देत आहेत.

तशीच काही स्थिती वर्ध्यातदेखीलअसल्याचं महाजन सांगतात. "जुलै महिन्यात मोठा पूर आला होता, त्यात आमची पीकं खरडून गेले. आम्ही शेतात पाणी येऊ नये म्हणून जेवढी बांध बंदिस्ती केली होती, ती फुटून गेली. शिवाय पाणी लवकर कमी झालं नाही त्यामुळे नदीकाठचं शेत खरडून गेलं. शिवाय पुरामुळे काही विहिरी खचल्या आहेत," महाजन सांगतात.

मात्र अकोल्यातील दहिहांडा गावात ४ एकर जमिनीवर शेती करणारे संतोष अंबुसकर यांच्यासमोर वेगळेच प्रश्न आहेत. त्यांच्या भागात यावर्षी जुलै महिन्यात एक चांगला पाऊस झाला होता, त्यानंतर तिथं चांगला पाऊस झालेला नाही.

"आमचा भाग खारपाणपट्ट्याचा भाग आहे. जर तुम्ही इथं जमिनीत बोरवेल खोदली तर तिला पूर्ण खारट पाणी लागतं. त्यामुळं इथली शेती पूर्णपणे पावसाच्या शेतीवर अवलंबून आहे. इथं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पुरता पाऊस पडला होता, त्यानंतर पावसात दीड महिन्याचं अंतर पडलं होतं. त्यामुळं मूग, उडीद आणि सोयाबीनसारखी खरीप पिकं पावसाअभावी जळून गेली," अंबुसकर सांगतात.

अकोलाच्या पातूर गावातील विजय निशानराव यांनी जुलै महिन्यात आलेल्या एका पावसानंतर त्यांच्या भागात पाऊस झाला नसल्याचं सांगितलं. "जुलै महिन्यात सुरुवातीला ढगफुटी झाली, तेव्हा नदीला पूर आला होता. त्यात आमच्या पराटीच्या पिकाचं नुकसान झालं, पण त्यानंतर आमच्या इथं काहीच पाऊस झाला नाही."

 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या ९ टक्के कमी पाऊस झाला आहे.

 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या ९ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र यात विभागवार मोठी तफावत असून कोकण सोडता महाराष्ट्रात इतर सर्वच विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा गतवर्षीच्या पातळीवर गेलेला नाही. जून महिन्यात उशिरा दाखल झालेला मान्सून, जुलै महिन्यात झालेला तुरळक पाऊस आणि १२० वर्षात पहिल्यांदा इतका कोरडा गेलेला ऑगस्ट महिना, अशा अनेक अडचणींमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे.

वाशीम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी विदर्भावर जागतिक हवामान बदलाचा झालेला गंभीर परिणाम स्पष्ट केला. "जूनमध्ये पाऊस पडला नाही त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे पेरण्या वाया गेल्या. विदर्भात बहुतांश जमीन कोरडवाहू आहे, त्यामुळे इथं किमान १५ दिवसांच्या अंतरावर पुरेसा पाऊस झाला पाहिजे. पण इथं पाऊस २२ ते २५ दिवसांच्या खंडाने पडतो. त्यामुळे पिकांवर त्याचा परिणाम होतो. शिवाय विदर्भात पावसाच्या परिस्थितीत दोन-दोन किलोमीटरवर फरक आहे. एकाच जिल्ह्याच्या काही गावांत शेतकरी पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आंदोलनं करत आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्यानं झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आंदोलन करत आहेत," अमदाबादकर सांगतात.

मोठ्या खंडाने पडणाऱ्या या पावसामुळे ऑक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी पूर्ण होईल. पण पाऊस ज्या प्रमाणात किंवा कालखंडात पाहिजे त्या प्रमाणात आणि कालखंडात पडत नाही आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. तर पावसाच्या बदलेल्या वर्तनामागे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं.

विदर्भात धरणांची संख्या अतिशय कमी आहे. विदर्भात मोठ्या आणि मध्यम क्षमतेची एकूण धरण संख्या फक्त १६ आहे. त्यांचा एकत्रित पाणीसाठा ४,०३२ घनमीटर एवढा आहे. जेव्हा की जायकवाडी धरणाची पाणी साठवणूक क्षमता ३,००० घनमीटरच्या आसपास आहे. वाशीम जिल्हा हा महाराष्ट्रातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक असून इथं कोणताही मोठा धरण प्रकल्प नाही. १६ सप्टेंबरपर्यंत विदर्भातील धरणांच्या एकूण पाणी साठवणूक क्षमतेच्या फक्त ७६ टक्के पाणीसाठा धरणात जमा आहे. गतवर्षी हे प्रमाण ८४ टक्के होतं.

 

 

बदलत्या हवामानाबरोबर विदर्भातील शेतकरी रानटी प्राण्यांच्या उच्छादानंही त्रस्त आहेत. "आमच्याकडे रोई (नीलगाय) आणि रान डुकरं यांचा हैदास वाढला आहे. डुकरांनी कापसाच्या रानात खड्डे केले आहेत, शिवाय पिकाचं नुकसानदेखील केलं आहे. या वन्यजीवांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी आमच्या भागात एक वनअधिकारी नेमून देण्यात आला. आमचं काही नुकसान झालं की त्याची तक्रार वनविभागाकडे करावी लागते. त्यानंतर ते येतात, (नुकसानीचा) फोटो काढतात आणि तुमच्या खात्यावर पैसे टाकतात," महाजन सांगतात.

"मात्र रानटी जनावरांकडून होणार त्रास हा फक्त एक दिवस होत नाही तर ते वारंवार येत असतात. आज एका ठिकाणी खड्डा केला तर उद्या दुसऱ्या ठिकाणी खड्डा करतात. एकाच शेतकऱ्यानं वारंवार तक्रार केली, तर वनखातंही सातत्यानं दखल घेत नाही. शिवाय आम्हाला सारखं तिथं जाणं पटत आणि परवडत नाही," महाजन पुढं सांगतात.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त हजार-बाराशे रुपये दिले जातात. त्यात पेट्रोलचा खर्च आणि एका दिवसाच्या कामाचं होणारं नुकसान पाहता लोकांनी तक्रार करण्यासाठी जाणं बंद केली असल्याचं महाजन म्हणाले.    

त्याशिवाय अंबुसकर यांच्या भागातदेखील माकडं आणि रानडुकरांचा त्रास असल्याचं त्यांनी सांगितलं. रानटी जनावरांपासून पिकाचं संरक्षण करताना काही शेतकऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला असल्याची माहिती अमदाबादकर यांनी दिली.

अशा अनेक अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र दुष्काळ जिल्ह्यानिहाय जाहीर केला जातो पण पाऊस काही जिल्हानिहाय पडत नाही, असं अमदाबादकर यांनी निदर्शनास आणून दिलं. 

"विदर्भात काही भागात अतिवृष्टीनं वाहून गेलेल्या पिकांची भरपाई दिली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनं होत आहेत. तर काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे वाया गेलेल्या पिकाची नुकसान भरपाई दिली जावी म्हणून आंदोलन होत आहे. सध्याच्या परिस्थितीचा गावनिहाय आढावा घेतला पाहिजे,"अशी मागणी अमदाबादकर करतात.