India

मुलाखत: भारतातील मुख्यधारेत आणि इथल्या तरुणांमध्ये विश्वास व सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला इथले पक्ष कमी पडले

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी या पक्षाला गळती लागली असून मातब्बर नेते पक्ष सोडून इतर पक्षांकडे वाटचाल करत आहेत.

Credit : इंडी जर्नल

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या विभाजनानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विधानसभा रद्दबादल झाल्यानंतर सरकारने पंचायतराज तत्त्वावर घडवून आणलेल्या निवडणुकांमध्ये अनेक नव्या नेत्यांनी उभारी घेतली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपी या पक्षाला गळती लागली असून त्यातील मातब्बर नेते पक्ष सोडून इतर पक्षांकडे वाटचाल करत आहेत. 

दिवंगत माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती सईद यांचे विश्वासू मानले जाणारे मातब्बर नेते, अनंतनाग विभागातील माजी आमदार आणि मेहबूबा मुफ्ती यांचे सल्लागार पिरजादा मन्सूर हुसेन यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स या सज्जाद लोन यांच्या पक्षात प्रवेश केला. स्वतः कश्मीरमधील एक ही राजकीय विश्लेषक व तुलनेने नेहमीच वादग्रस्त असलेल्या दक्षिण कश्मीर भागाचे नेते असणाऱ्या पिरझादा यांच्या या चालीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता येत्या काळात नक्की काय बदल पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. यानिमित्त त्यांच्याशी इंडी जर्नलने केलेली ही सविस्तर बातचीत:

 

तुम्ही नुकतीच पीडीपी पक्षातून बाहेर पडून नवी वाट चोखंदळत आहात. बराच काळ असं म्हटलं जायचं की पक्षातील घडी बदलून त्याला नवं वळण देणाऱ्या एका अंतर्गत गटाचे तुम्ही नेते आहात किंवा तुम्ही स्वतः या गटाचा नेतृत्व करत आहात. आता तुम्ही बाहेर पडल्यानंतर या विषयी वेगवेगळ्या अटकळी मांडल्या जात आहेत. या एकूण घडामोडींवर तुमचं मत काय आहे?

नव्या नेतृत्वाला पक्षांतर्गत नेत्यांच्या फळीला समजून घेणे शक्य झालं नाही. नेमकं काय चुकलं याचा अंदाज नाही पण पक्षांतर्गत काहीतरी चुकीचे घडत होतं. मुफ्ती सईद यांच्या निधनानंतर गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या. ते पक्षाचे नेते असताना सर्वांना पक्षात सामावून घेतले जायचे. दोघा तिघांना एकत्र बोलावून ते सर्वांशी सल्लामसलत करायचे. आता जर तुमच्या १४ कॅबिनेट मंत्र्यांपैकी अकरा मंत्री पक्ष सोडून जात असतील तर तुम्हाला याचा अंदाज येत असावा की काहीतरी वेगळं होतं आहे. काही नेते दुसऱ्या फळीत तेच जास्त कार्यक्षम असतात पहिल्या फळीत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर ते ढेपाळतात.

मला अजूनही माहित नाही की पक्षांतर्गत एखादा निर्णय घेतल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी होत्या त्यामुळे सर्व मताने घेतलेले निर्णय अचानक बदलले जायचे. मी तुम्हाला अशा शेकडो गोष्टी नोंदवून सांगू शकतो की ज्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने अचानक आपली भूमिका बदलली. २००८ पासून ते २०१४ पर्यंत आमच्यातील २१ जणांनी विरोधी पक्षाची धुरा सांभाळली. त्या सर्वांशी मुक्ती साहेब असताना सतत संपर्क व्हायचा. ही पूर्ण परंपराच ते गेल्यानंतर बंद झाली. बारामूल्ला जिल्ह्यातील बशरथ बुखारी असोत, बेग साहेब असोत की सफीना मॅडम, या सर्वांना पक्षाचे निर्णय घेण्याची स्वतंत्रता होती. ही एक गोष्ट.

 

Credit- PTI

 

पक्ष सोडण्याचा निर्णय घेताना तुम्ही या गोष्टी नेतृत्वाच्या समोर आणून चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला होतात का?

मी पक्ष सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन अडीच वर्षे झाली होती. हा माझ्यासाठी फार कठीण निर्णय होता. हा पक्ष वाढवण्यासाठी मी वयाच्या तिशीपासून काम केलं होतं. त्याला सोडून जाणं ही खरोखर दुःखद बाब होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी पक्षाच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांच्याशी पक्षाची वाटचाल व पार्टी लाईन काय असावी याची सविस्तर चर्चा केली. मुफ्ती सईद साहेब असताना आपला विरोध कायम ठेवायचा आणि लाल रेषा ओलांडायची नाही असा त्यांचा कटाक्ष असे. मात्र नंतर नेत्यांनी स्वस्तातल्या लोकप्रियतेसाठी ती रेषा ओलांडली. केवळ काही मतांसाठी भारतीय सरकारवर तीव्र शब्दांत टीका करून त्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यामुळं पक्षाचा जनाधार कमी होत गेला आणि तरुण गोंधळले.

 

कलम ३७० हटवल्यानंतर येथील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता?

५ ऑगस्ट २०१९ च्या रात्री जे काही झालं त्याचं समर्थन कश्मीरमधील कोणताही नेता करणार नाही. आम्ही स्वतः याविषयी अनेकदा बोललो आहोत. यासंदर्भात माझ्या मते जितकी जबाबदारी केंद्रातील विविध नेत्यांची होती त्यापेक्षा जास्त जबाबदारी येथील स्थानिक नेत्यांची होती. मी तर म्हणेन कलम ३७० हटवलं गेलं याला ९०% कारणीभूत इथली स्थानिक नेते मंडळी आहेत ज्यांचं राजकारण सपशेल चुकलं. 

 

तुम्ही ही गोष्ट कुणाकडे इशारा करून म्हणत आहात काय?

इशारा करण्याचा काही मुद्दाच नाही. सर्व जनतेला सत्य माहीत आहे.

 

येथील मुख्य धारेतील पक्षांची भूमिका आणि सध्याच्या परिस्थितीचा काय परस्पसंबंध वाटतो?

स्वातंत्र्यानंतर येथील मुख्य धारेतील राजकीय पक्षांनी आपली भूमिका चुकीची ठरवून घेतली होती. भारतातील मुख्यधारेत आणि इथल्या तरुणांमध्ये विश्वास व सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला पक्ष कमी पडले. भूमिकांमध्ये सतत चलबिचल करणे आणि लोकांसमोर 'मी पूर्णपणे भारतीय नाही' अशी भूमिका घेणे हे लोकांना गोंधळून टाकणारे ठरले. फूटून निघण्याची भाषा करण्यामुळे प्रदेशातील लोकांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त झाला आहे. वरवर एक वेगळी भूमिका घ्यायची आणि आतून वेगळेच राजकारण शिजवायचं यामुळे जनता व्यथित झाली होती. आता जनतेने राज्याचा दर्जा आणि जे काही गमावलं आहे ते परत आणण्यासाठी एक तर केंद्राशी बोलली करावी लागतील आणि हे करण्यासाठी तुम्ही फक्त कश्मीरी म्हणून ७० लाख लोकांतर्फे काही मागाल तर ते मिळणार नाही. तुम्हाला त्यासाठी १३० कोटी लोकसंख्येचा भाग होऊन ते प्राप्त करून घ्यावे लागेल. देशाचे समान नागरिक म्हणून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. राजस्थान किंवा महाराष्ट्र किंवा कर्नाटकामधील एखाद्या व्यक्तीप्रमाणे येथील नागरिकांना समान हक्क मिळायला हवेत या भाषेत केंद्र सरकारशी बोलणी करायला हवीत.

 

आता या टप्प्यावर येऊन तुम्ही पीपल्स कॉन्फरन्ससाठी काम करता आहात. या नव्या पर्यायात तुम्हाला काय शक्यता वाटते?

JKPC पक्षाला आपला एक स्वतंत्र इतिहास आहे. हा पक्षाने गेल्या ४० वर्षांपासून काश्‍मीर खोऱ्यामध्ये कार्यरत आहे. पक्षाचे नेते जनतेशी चांगला संपर्क राखून आहेत व ते स्वतः वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगलं काम करत आहेत. सज्जाद लोन यांची लोकांप्रती असणारी निष्ठा आणि स्वभाव पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार देणारा ठरला आहे. मी माझ्या आयुष्यातील तारुण्याची वर्षे जेव्हा पिडीपी पक्षासाठी दिली तेव्हा ' हा पक्ष चालणार नाही, कधीच सत्तेत येणार नाही, एनसी सारखा प्रबळ पक्ष असता टिकुच शकणार नाही' अशी अटकळ लोक बांधतच होते. पक्ष जनतेत रुजला आणि सत्तेत आला. त्याचप्रकारे मी आता आयुष्याची उरलेली वर्षे JKPC पक्षासाठी घालवणार आहे. हा पक्ष खोऱ्यातील लोकांसाठी सुयोग्य पर्याय असेल, किंबहूना पहिल्या क्रमांकावर असणारा पक्ष बनेल असं मला वाटतं. दक्षिण कश्मिरमध्ये पक्षाचं काम करणारा मी पहिला नेता आहे. त्यामुळं काम मोठं आहे. देवाच्या कृपेने, आम्ही नक्कीच उत्तरेपेक्षा मोठा जनाधार दक्षिणेत मिळवू शकू.