India

शेतकरी आमचं ऐकत नाहीत, त्यांना फसवावं लागेल - भाजप कार्यकर्ते

भारतीय जनता पक्षाच्या सभेत शेतकऱ्यांना फसवण्यासाठी नेत्यांना टीप मागणाऱ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसची टीका.

Credit : NDTV.com

"शेतकरी आंदोलनातील सर्व सहभागी मोर्चेकरी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं," असं भारतीय जनता पक्षाच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना आवाहन केलं. हरियाणामधील गुरगाव इथं पक्षाची बैठक भरलेली असताना हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष ओपी धनकर, क्रीडा मंत्री संदीप सिंग आणि हेसार मतदार संघातील भाजप खासदार विजेंद्रसिंग हेही या सभेला उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असून काँग्रेस पक्षानं यावर खरमरीत टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधताना ट्वीट केलं आहे. "शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी भाजपाकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी ते आता आपल्या नेत्यांकडे नव्या मुद्द्यांची मागणी करत आहेत. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे," असं त्यांनी आपल्या  ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सुरजेवाला यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये एक भाजप कार्यकर्ता नेत्यांना प्रश्न विचारत आहे की "आमचं काहीच ऐकू न घेणाऱ्या शेतकऱ्यांना फसवण्यासाठी काही मुद्दे सांगा." यावेळी इतर कार्यकर्ते आणि नेते लक्षपूर्वक ऐकत आहेत, असं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. किमान आधारभूत मूल्य मिळेल याची शाश्वती मिळावी आणि संसदेनं पारित केलेले कृषिविषयक तीन कायदे मागे घेतले जावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यामध्ये प्रामुख्यानं पंजाब हरयाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमधून आलेल्या शेतकऱ्यांचा भरणा आहे. आंदोलक आणि सरकारदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्या पूर्णपणे निष्फळ ठरल्या आहेत. मागील महिन्यात २६ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आंदोलनाचे प्रभारी व नेते राकेश टिकैत यांनी देशभर दौरे करून आंदोलनासाठी सर्वसामान्य जनतेची व देशभरातील शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवली आहे.

शेतकरी नेत्यांनी आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट करताना "आपल्या मागण्या मान्य केल्याखेरीज शेतकरी रस्त्यांवरून हलणार नाहीत," अशी घोषणा केली आहे. 'आता निर्णय पूर्णपणे सरकारच्या ताब्यामध्ये असून त्यांनीच यावर आपलं मत मांडावं,' असा पुनरुच्चार राकेश टिकैत त्यांनी केला आहे. मागच्या आठवड्यातच शेतकरी आंदोलनातील एका गटानं चार तासांसाठी रेल रोको आंदोलन केलं होते.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्ष तसेच विरोधी गट शेतकऱ्यांना आंदोलनासाठी फुस लावत असून त्यांना सरकार विरुद्ध भडकवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रातील अनेक नेत्यांनी याच विधानाचा पुनरुच्चार केला होता. आता मात्र पक्षाच्या सभेतूनच असा व्हिडिओ बाहेर आल्यानं भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचं चित्र दिसत आहे. यासंबंधी भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळू शकली नाही.