India

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी तेल गळती?

याला जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरणवादी आणि स्थानिकांकडून केला जात आहे.

Credit : Indie Journal

 

ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर काल संध्याकाळी तेलाचा तवंग पाहण्यात आला. सुमारे ८ ते १० किमी लांब असलेल्या समुद्र किनारपट्टीच्या दोन ते तीन किलोमीटर भागात काळ्या रंगाचा तवंग जमा झाला आहे. त्यानंतर हा तवंग जमा होण्यामागचं कारण काय, याला जबाबदार कोण आणि याच्या सफाईची जबाबदारी कोणाची असे प्रश्न पर्यावरणवादी आणि स्थानिकांकडून केले जात आहेत. 

पर्यटकांसाठी होमस्टे सुविधा पुरवणारे मल्हार इंदुलकर काल त्यांच्याकडे आलेल्या पर्यटकांना घेऊन गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर गेले होते. 

"तेव्हा समुद्र किनाऱ्यावर तेल पडलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मी माझ्या इथं आलेल्या पर्यटकांना घेऊन तिथं गेल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर काळ्या रंगाच्या ठिपक्यांचे पट्टे पडले होते. त्या ठिपक्यांना पट्ट्यांना अधिक जवळून पाहिलं असता ते पट्टे तेलाचे असून त्याला पेट्रोल सारखा वास येत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याबद्दल मी फेसबुक पोस्ट केली," इंदुलकर सांगतात. 

याबद्दलचं नेमकं कारण इंदुलकर यांना समजलं नाही म्हणून त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. तर हे तेल एखाद्या बुडलेल्या जहाजातून पडत असावं किंवा एखाद्या होडीची गळती सुरु असावी अशी माहिती त्यांना मिळाली. मात्र या किनारपट्टीचं महत्त्व ते जाणून असल्यानं ते या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचं इंदुलकर म्हणाले. 

 

गुहागरची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी बनवण्याची जागा आहे.

 

गुहागरची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी बनवण्याची जागा आहे. या संख्या घटत असल्यानं या प्रजातीच्या कासवांना संवेदनशील प्रजातींमध्ये गणलं जातं. कातडी आणि तेल काढण्यासाठी या कासवांची हत्या केली जाते तर यांच्या अंड्यांना खाण्यासाठी वापरलं जातं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर या कासवांची घरटी जास्त नसतात. मात्र सातत्यानं घटत असलेल्या संख्येमुळं सध्या त्यांच संवर्धन केलं जात आहे. 

कासवांच्या अंड्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे गुहागरचे अक्षय खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षीच्या मोसमात म्हणजे मागच्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर साधारणपणे डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते एप्रिलच्या शेवटापर्यंत गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर कासवांनी २१ ते २२ हजार अंडी दिली होती." इतक्या महत्त्वाच्या जागी अशा प्रकारचा तेलाचा तवंग येणं या कासवांसाठी धोकादायक ठरू शकतो असं खरे यांनी म्हटलं. शिवाय यामागचं कारण जवळपास झालेला कोणता तेल गळतीचा प्रकार नसून पावसाळ्यामुळं समुद्रात जमा झालेलं तेल नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळं किनाऱ्यावर आलं असावं असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात भूगोलाच्या प्राध्यापिका असलेल्या सुचित्रा परदेशी यांनी या मागे वाढतं प्रदूषण जबाबदार असल्याचं सांगितलं. " गुहागरच्या भागात अनेक बंदरं आहेत. तिथून कोळी मोठ्या संख्येनं मासेमारीसाठी जातात, आजकाल कोणी हातानं नौका चालवत नाही. त्यांचं तेल समुद्रात सांडल्यानंतर प्रदूषण होतं, हे प्रदूषण पावसाळ्यात किनाऱ्यापर्यंत पोहचत. समुद्र तसा अफाट आहे, त्याला पाऊस पडल्यानं काही विशेष फरक पडत नाही. मात्र पावसाळ्यात वारे वेगानं वाहत असतात. त्यामुळं समुद्रात जमा होणारा तेलाचा तवंग काही वेळेस समुद्र किनाऱ्यावर येतो, हे दरवेळी होईलच असं गरजेचं नाही," परदेशी सांगतात. 

पाण्यावर तेलाचा तवंग जोपर्यंत आपल्याला दिसेल इतक्या प्रमाणात वाढत नाही तोपर्यंत आपल्याला तिथं प्रदूषण होतंय याची जाणीव होत नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एप्रिल ते सप्टेंबरच्या काळात तेलाचे गोळे जमा होतात. याचं कारण नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतं, असं जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र मोठ्या जहाजांकडून समुद्रात सोडल्या जाणाऱ्या इंधन आणि तेलामुळं हे तयार होतात, असं म्हटलं जातं. 

 

एका पर्यावरणाशी संबंधित संस्थेसाठी चिपळूण विभागात काम करणारे पंकज दळवी यांनी या घटनेमागे नक्की कोण जबाबदार आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी केली, तर आता या समुद्र किनाऱ्यावर जमा झालेलं तेल नक्की कोण साफ करणार असा प्रश्न देखील उपस्थित केला. "समुद्र किनारपट्टीच्या सुमारे दोन ते तीन किलोमीटर भागात हा तेलाचा तवंग जमा झाला आहे. प्रथम दर्शनी पाहता हे जहाजांनी वापरून सोडून दिलेलं तेल आहे दिसून येत. हे तेल समुद्रातून जाणाऱ्या एखाद्या जहाजानं समुद्रात सोडून दिलं असावं, असं मला वाटतं. मात्र नक्की काही सांगितलं जाऊ शकत नाही. जर ते तेल कोणत्या जहाजानं सोडलं असेल तर तटरक्षक दलानं याबद्दल तपास केला पाहिजे. शिवाय आता हे तेल नक्की सफाई तटरक्षक दल करणार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार की जिल्हा प्रशासन करणार हा प्रश्न सुद्धा आहे," दळवी सांगतात. 

त्यांना या घटनेची माहिती मिळाल्यापासून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भारतीय तटरक्षक दलासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क होत नसल्याचं दळवी म्हणाले. इंडी जर्नलनं सुद्धा रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण कार्यालयात संपर्क साधला होता. मात्र जिल्हाधिकारी किंवा मंडळाच्या अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

जहाजांकडून तेल समुद्रात सोडणं बेकायदेशीर आहे. मात्र या संबंधीच्या कायद्यांना धाब्यावर बसवून परवानगीपेक्षा जास्त तेल समुद्रात सोडण्याचा प्रकार सर्रास घडतो. त्यातून सुद्धा असे तवंग जमा होण्याचे प्रकार घडत असतात. गुहागर इथं जमा झालेल्या तेलाच्या तवंगाचं कारण अजून स्पष्ट नाही. याबद्दल चौकशी होणं गरजेचं आहे, मात्र तवंग जमा होण्याची अशीच घटना २०२१ साली घडल्याची एका बातमी प्रकाशित झाली होती. त्यावेळी देखील सदर घटनेची जबाबदारी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे ढकलण्याचा प्रकार घडला होता, असं ती बातमी वाचल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळं यावेळीदेखील या घटनेकडे दुर्लक्षचं होणार का अशी चिंता व्यक्त केली जात आहे.