India
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा दिवाळी बाजार
कारागृह उद्योग महाराष्ट्र विक्री केंद्र वर्षभर चालवलं जातं.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडून २०११ पासून कारागृह उद्योग महाराष्ट्र विक्री केंद्राअंतर्गत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, मकरसंक्रांत, नाताळ, रक्षाबंध, यासारख्या सणांच्या वेळी मेळावे भरवले जातात, ज्यात कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. कारागृह उद्योग महाराष्ट्र विक्री केंद्र वर्षभर चालवलं जातं, मात्र सणांदरम्यान विशेष सवलती देत केंद्रांबाहेर मेळावे लावले जातात. यंदाच्या मेळाव्यामध्ये विविध आकाशकंदील, लाकडी शोभेच्या वस्तू, लाकडी फर्निचर, आकाशकंदील, पणत्या, लहान मोठ्यांचे कपडे, बेकरी उत्पादनं, चामड्याचे बेल्ट आणि चपला, अशा विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू कारागृहातील बंदींनी बनवल्या आहेत.
या संदर्भात बोलताना कारागृहातील बंदींना शिवणकाम आणि भरतकाम शिकवणाऱ्या प्रशिक्षक सांगतात, “कधीकधी बाहेरून कच्चा माल आणला जातो, अनेकदा काही स्वयंसेवी संस्था बंदी विकास कौशल्य प्रशिक्षणासाठी लागणार कच्चा माल पाठवून देतात. त्यातून आम्ही बंदींना विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देतो आणि तो माल बाहेर विकला जातो. मी वस्त्रोद्योग विभागात गेली १९ वर्ष प्रशिक्षकाचं काम करत आहे. आता कैद्यांना वेळ घालवण्यासाठी टीव्ही वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचदा काही कैदी कंटाळा करतात. पण स्वतःहून स्वखुशीनं प्रशिक्षणासाठी येणारे कैदीदेखील अनेक असतात. त्यांचं मन वळवण्यासाठी आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागतात, त्यांना लाडीगोडी लावावी लागते. त्यातल्या अनेक बायकांना घरची ओढ असते, कुणाचं मन लागत नाही. मग अशा महिलांना प्रशिक्षणात वळवता येतं. बऱ्याचदा वकिलाचे पैसे वगैरे भरण्यासाठीदेखील त्या काम करण्यास तयार होतात.”

त्या पुढं सांगतात, “सध्या वस्त्रोद्योग विभागात किमान ४० महिला प्रशिक्षण घेत आहेत. मुख्य कारागृहात असणाऱ्या कैद्यांना यात सहभागी व्हावं लागेल अशी सक्ती नाही. ज्यांना रुची आहे, नवीन शिकायची इच्छा आहे, त्या महिला सहभागी होतात. आम्ही कुठलीही सक्ती करत नाही. मुळात हे कैदी काही शिकायला इथे आलेले नसतात. काहीतरी गुन्ह्यांमुळे किंवा त्यांच्या मानसिकतेमुळे ते इथे आलेले असतात. त्यातून आम्ही फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो."
कैद्यांसाठी चर्मोद्योग, वस्त्रोद्योग, सुतारकाम,लोहारकाम, हातमाग, शिवणकाम, बेकरी प्रशिक्षण, रंगकाम, असे १४ विभाग आहेत. प्रत्येक महिन्याला कैद्यांना त्यांच्या कामाप्रमाणे वेतन मिळतं.
1.jpeg)
"त्यांचा कारागृहातील वेळ चांगल्या कामांसाठी जावा, त्यातून त्यांना फायदा मिळावा, उत्पन्नाचं साधन मिळावं, यासाठी आम्ही काम करतो. त्यांना काही वेगळं प्रशिक्षण हवं असेल, तर ते सुद्धा आम्ही शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो तरुण कैदी ज्यांच्यात शिकण्याची क्षमता अधिक आहे, महिला याचा फायदा घेतात. याचा फायदा त्यांना बाहेरदेखील होतो. अनेकदा मुलाबाळांचा विचार, खटल्याचा विचार, यासारख्या मानसिक ताणामुळेही त्यांचं मन विचलित होतं. पण आम्ही त्यांच्यावर सक्ती करत नाही. त्यांनी अनेकदा चिडचिड केली, अपशब्द वापरले तर आम्ही सहन करतो. आमच्यासोबत रक्षकदेखील असतात. वर्षभर हे काम सुरु असतं. दिवाळीच्या निमित्तानं पणती सजवणं, आकाशकंदील तयार करणं, अशा गोष्टीदेखील आम्ही करून घेतो,” प्रशिक्षक सांगतात.
दुसरीकडे खुल्या कारागृहातील बंदीदेखील अशा अनेक कामांमध्ये सहभागी होतात. खुल्या कारागृहात मोठ्या शिक्षा झालेल्या बंदींना पाठवलं जाते. परंतु इथं फक्त स्वखुशीनं नाही तर सर्वांनाच काम करणं बंधनकारक आहे. अनेकदा कैद्यांची वागणूक आणि काम पाहून त्यांच्या शिक्षाही कमी केल्या जातात.
.jpeg)
यासंदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक शामकांत शेडगे सांगतात, “२६५ एकर परिसरावर शेती, मंगलकार्यालय, इस्त्री, सलून, रोपवाटिका, गवंडीकाम, बकरी पालन, गौ पालन, कुकुटपालन, धोबीकाम, वायर हार्नेसिंग, जिम, हॉटेल, फॅक्ट्री, गांडूळ खत प्रकल्प, कार वॉश सेंटर, धाग्यांपासून कापड बनवणं, असे अनेक युनिट आहेत. ब्रोकोली, स्ट्रॉबेरी तसंच वेगवेगळल्या प्रकारच्या भाज्यांची लागवड, मंगल कार्यालयात साफसफाई आणि डागडुजीची काम बंद्यांद्वारे केली जातात. सामान्य नागरिकांना कार्यालय भाड्यानं दिल्यानंतर मिळणारं उत्पन्न सरकार आणि कैदी कल्याणासाठी दिलं जातं. प्रेसमध्ये नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे कपडेदेखील इस्त्री करून मिळतात, अंडी उत्पादन, कोंबडी विक्री अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. त्या कोंबड्यांना वाढवणं, त्यांची विक्री, ही कामं कैद्यांना सोपवली जातात."
“एका प्रकारे ही त्यांची शिक्षा आहे आणि हे कष्ट करणं त्यांना भागच आहे. जर जन्मठेप असेल तर ५ वर्षं मुख्य कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर त्यांना खुल्या कारागृहात पाठवलं जातं. त्यांना रोज ८ तास काम करणं बंधनकारक आहे. मिंडा युनिटमध्ये बजाजच्या दोन चाकी गाड्यांना तार जोडण्याचं काम केलं जातं. यासाठी बजाज कंपनीसोबत सामंज्यक करार झालेला आहे. रोज ३० ते ४० युनिट तारा तयार होतात. कच्चा माल कंपनी पुरवते आणि आपण फक्त मनुष्य बळ पुरवण्याचं काम करतो,” शेडगे सांगतात.

पुढे ते म्हणतात “ज्या हातानं कधी खून केला असेल, आम्ही त्याच हातात आता कात्री देऊन सलूनमध्ये काम करायला लावतो. आणि या सगळ्या सुविधांचा उपयोग सामान्य नागरिकांना होतो. कैद्यांना समाजात विरघळवण्याची ही शेवटची पायरी असते.”
३ ऑक्टोबर रोजी दिवाळी मेळाव्याचं उदघाटन झालं असून दिवाळी संपेपर्यंत मेळावा सुरु राहील.