India

दिल्ली: मुखर्जीनगर आग दुर्घटनेत जखमींची संख्या लपवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

कोचिंग सेंटरला गुरुवारी लागलेल्या आगीपासुन बचाव करण्याच्या प्रयत्नात ७० च्या आसपास विद्यार्थी किरकोळरित्या जखमी.

Credit : इंडी जर्नल

 

दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात एका कोचिंग सेंटरला गुरुवारी लागलेल्या आगीपासुन बचाव करण्याच्या प्रयत्नात ७० च्या आसपास विद्यार्थी किरकोळरित्या जखमी झाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात असताना तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र प्रशासन या 'प्रकरणात संदिग्ध वर्तन करत असून, काही माहिती विद्यार्थ्यांपासून लपवली जात' असल्याचा आरोप केलाय. जखमींचा एकदा सांगितला जातोय त्यापेक्षा जास्त असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दिल्लीच्या मुखर्जीनगर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप नाकारले आहेत.

उत्तर दिल्लीतील एक उपनगर मुखर्जीनगर हे कोचिंग सेंटर्ससाठी प्रसिद्ध आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी इथं येतात. २०१७ च्या आकडेवारीनुसार सुमारे ४०० हुन अधिक कोचिंग सेवा या भागात इच्छुक उमेदवारांकडून केंद्रिय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात. त्यानंतर हा आकडा वाढला असण्याचीच शक्यता आहे.

इथं शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एका कोर्ससाठी किमान दीड ते दोन लाख रुपये खर्चावे लागतात. याव्यतिरिक्त राहण्या-खाण्याचा खर्च वेगळा होतो. त्यामुळं या भागात विद्यार्थ्यांना खानावळी, झेरॉक्स, भाड्यानं घरं, इत्यादी सारख्या इतर सोयीसुविधा पुरवणाऱ्यांची सुद्धा गर्दी आहे. या भागाचा संपूर्ण आर्थिक गाडा या विद्यार्थ्यांच्या कोचिंगवर अवलंबून आहे.

गुरुवारी १५ जूनला याच भागातील चार मजली 'बथ्रा कॉम्प्लेक्स'मध्ये लागल्या आगीमूळ तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या काचा फोडून एका केबलच्या साहाय्यानं खाली उतरण्याची जीवघेणी कसरत करावी लागली. यावेळी खाली उतरण्याच्या गडबडीत बरेच विद्यार्थी खाली पडले आणि त्यातील काहींना गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचं वृत्त आहे.

 

 

मात्र त्याचवेळी सदर इमारतीत कोचिंग क्लासेसना जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या प्रकरणात प्रशासन संदिग्ध वर्तन करत असून, काही माहिती विद्यार्थ्यांपासून लपवली जात असल्याचा आरोप केला आहे. सदर इमारतीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं नाव नं छापण्याच्या अटीवर इंडी जर्नलला सांगितलं, "आम्ही अपघात झाल्यापासून त्या इमारतीबाहेर बसलो आहोत. आग लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तिथून बाहेर येता आलं नाही, पोलिसांनी तिथं रुग्णवाहिका आणून ठेवल्या आहेत. कोणीही गंभीररित्या जखमी किंवा मृत नसल्याचं प्रशासन म्हणत आहे. जर सर्व विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेलंय तर मग इथं रुग्णवाहिका का होत्या? जर कोणीही मृत नसेल तर आम्हाला त्या इमारतीत लगेच प्रवेश करून का दिला नाही? आम्हाला प्रवेश दिला तेव्हा काही खोल्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, प्रशासन काहीतरी लपवतंय असं आम्हाला वाटतं."

याबद्दल विचारलं असता दिल्लीच्या मुखर्जीनगर पोलीस चौकीचे प्रभारी सदर दाव्यांचं खंडन केलं. "दिल्ली ही राजधानी आहे, इथं काहीही लपवलं जाऊ शकत नाही. जे कोणी असा आरोप करत आहेत ती खोटी लोकं आहेत. ते विद्यार्थी नाहीत, विद्यार्थ्यांच्या नावाखाली दुसरेच कोणीतरी आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये."

"७० च्या आसपास विद्यार्थी जखमी होते, त्यात दोन, तीन थोडे गंभीर होते. सर्व विद्यार्थ्यांना वेळीच दवाखान्यात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार झाले असून आता सर्व जण धोक्यातून बाहेर आहेत. बहुतेकांना दवाखान्यातून सोडण्यात आलंय. या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडलं नाही. कोचिंग क्लास मालकांवर गुन्हा नोंदवला, असून पुढील प्रक्रिया सुरु आहे," त्यांनी पुढं सांगितलं.

या क्लासची इमारत अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं विद्यार्थी सांगतात. "इमारतीचा जिना अतिशय अरुंद आहे, या जिन्यातून एकावेळी एकच माणूस येऊ किंवा जाऊ शकतो. शिवाय या इमारतीत प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर निघण्यासाठी तेवढा एकचं मार्ग आहे. याच जिन्यात विजेचे मीटर लावले आहेत. आग या मीटरला लागल्यामुळं इमारतीतून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग आतील विद्यार्थ्यांसाठी शिल्लक नव्हता," एक विद्यार्थी म्हणाला.

आग लागली त्यावेळी त्या इमारतीत दोन वेगळे वर्ग सुरु असल्याचं विद्यार्थी सांगतात. त्यातील एक अभ्यासिका होती तर दुसऱ्या खोलीत नव्यानं भरती झालेल्या मुलांचा वर्ग. "वर्ग नव्यानं सुरु झाल्यामुळं २०० च्या आसपास विद्यार्थी तिथं होते. त्यातील काही विद्यार्थ्यांनी नुकताच त्या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता तर काही विद्यार्थी डेमो व्याख्यानासाठी तिथं आले होते. त्यामुळं नक्की किती विद्यार्थी तिथं होते हे सांगणं अवघड आहे," तो विद्यार्थी पुढं सांगतो.

या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून क्लासच्या मालकांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३३६ (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे), ३३७ (इतरांचे जीव धोक्यात घालून किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणून दुखापत करणे), ३३८ (इतरांचे जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणून गंभीर दुखापत करणे) आणि १२०बी (शिक्षा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

याशिवाय तिथल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनावर कोचिंग क्लासेसशी हातमिळवणी करून प्रकरण दाबण्याचा आणि विद्यार्थ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. "ही आग लागल्याची घटना घडल्यानंतर फक्त एकच दिवस या घटनेच्या बातम्या देण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी या घटनेला पुरेशी प्रसिद्धी दिली नाही. शिवाय या घटनेत सांगितल्यापेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत आणि आमची अशी शंका आहे की काही जणांचा मृत्यू झाला असून प्रशासन त्यांचा मृत्यू लपवण्याचा प्रयत्न करतंय," एका दुसऱ्या विद्यार्थ्यानं आरोप केला.

महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या एका विद्यार्थ्यानं याबद्दल काही स्पष्ट माहिती नसल्याचं सांगितलं. "त्या इमारतीत २०० च्या आसपास विद्यार्थी होते. आग तळमजल्यात लागली क्लास वरती सुरु होते. खाली यायला मार्ग शिल्लक नसल्यानं काही विद्यार्थ्यांनी खिडक्यांतून खाली उतरायचा प्रयत्न केला, तेव्हा काही विद्यार्थी जखमी झाले. यात एका विद्यार्थिनीच्या डोक्याला दुखापत झाली असून ती सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. कोणाचाही मृत्यू झाल्याचं मला कळलं नाही," तो म्हणाला. मात्र या क्लासशी संबंधित विद्यार्थी अपघाताविषयी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं मात्र त्यानं सांगितलं.

मुखर्जीनगरमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत राहिला आहे. महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "जुन्या रहिवाशी इमारतींमध्ये छोटेमोठे बदल करून बहुतेक कोचिंग केंद्र त्या इमारतीत काढली जातात. त्या इमारतींना येण्याजाण्यासाठी एकच अरुंद जिना असतो. शिवाय वर्गखोल्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी छोट्या आहेत. त्यांचा दरवाजासुद्धा छोटासा असतो. त्यामुळं विद्यार्थ्यांना संकटाच्यावेळी एकदम बाहेर पडता येत नाही."

ज्या इमारतीत अपघात घडला त्याची परिस्थितीसुद्धा तशीच होती आणि त्या इमारतीत पुरेशी सुरक्षा किंवा अग्निशमन यंत्रणा नव्हती, असं तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं या घटनेची स्वतः दखल घेतली. न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार," सदर इमारतीत बाहेर पडण्याचा रास्ता अरुंद होता. इमारतीत कोणत्याही प्रकारचं अग्नी सुरक्षा संसाधनं नव्हती, आणि इमारत अग्नी सुरक्षा लक्ष्यात घेऊन तयार केली नव्हती." आता मुखर्जीनगरमध्ये असलेल्या सर्व कोचिंग क्लासेसची सुरक्षा तपासणी होईपर्यंत सर्व कोचिंग सेंटर्स बंद ठेवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत.

देशभरातून लाखो विद्यार्थी सरकारी अधिकारी बनण्याचं त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुखर्जीनगरमध्ये येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक स्थितीही चांगली नसते. त्यामुळं खर्च कमी करण्यासाठी साध्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेऊन ते स्वतःचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वर्गाची शिकवणी कमी ठेवण्याच्या प्रयत्नात क्लास मालकांकडून बऱ्याच वेळा मूलभूत सुरक्षा उपाययोजना आणि संसाधनकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं जातं. गुरुवारी घडलेला प्रकार त्याचाच परिणाम असू शकतो. तरी सुरक्षा विषयी हेळसांड करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर प्रशासनानं योग्य ती कारवाई करून शुक्रवारी घडलेल्या घटनेचं संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड करावं अशी मागणी तिथले विद्यार्थी करत आहे.