India

अभाविपचा पुणे विद्यापीठात एसएफआय विद्यार्थी संघटनेवर हल्ला, ५ कार्यकर्ते जखमी

हल्ल्यात दोन पुरुष आणि एक महिला विद्यार्थी अशा तीन जणांना दुखापत झाली आहे.

Credit : इंडी जर्नल

 

पुणे विद्यापीठात सभासद नोंदणी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) काही सभासदांनी विनाकारण हल्ला केल्याचा आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी केला आहे. या हल्ल्यात दोन पुरुष आणि एक महिला विद्यार्थी अशा तीन जणांना दुखापत झाली आहे. त्यांना तूर्तास तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दुसरीकडं अभाविपनं त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले असून, पहिला हल्ला एसएफआय कडून झाला, असा दावा केला आहे. दोन्ही गट चतुशृंगी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करायला गेले होते, मात्र आज संध्याकाळपर्यंत कोणाचीही तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.

पुणे विद्यापीठात एसएफआयकडून सभासद नोंदणी शिबीर भरवण्यात आलं होतं. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. शिवाय संघटनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता, अशी माहिती एसएफआयचे अभिषेक शिंदे देतात.

"त्याचवेळी अभाविपचे काही सभासद आमच्या टेबल जवळ आले आणि दादागिरी करू लागले. त्यांनी आमच्याकडे आम्हाला परवानगी आहे का, अशी विचारणा केली. आम्ही त्यांना तुम्ही कोणत्या अधिकाराखाली आम्हाला परवानगीचं विचारता, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर आमच्यात वाद वाढला आणि त्यांनी अचानक मारामारी सुरु केली," अशी माहिती शिंदे पुढं देतात.

अभाविपचे आनंद भुसनर मात्र या वादाला एबीव्हीपी नव्हे तर एसएफआय जबाबदार असल्याचं सांगतात. 

"आम्ही उद्या एक यात्रा काढणार आहोत, त्याच्या परवानगीसाठी आम्ही विद्यापीठात गेलो होतो. परवानगी घेतल्यानंतर माघारी जात असताना आम्हाला एसएफआयच्या कार्यकर्त्यांकडून सुरु असलेलं सभासद नोंदणी शिबीर दिसलं. त्या शिबिरात विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीनं सदस्य पदाचा अर्ज भरण्यात येत होता. तेव्हा आम्ही त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी दादागिरी करत आमच्यावर हल्ला केला," भुसनर म्हणतात.

 

 

एसएफआयच्या आकाश लोणकर यांच्यानुसार हा हल्ला पूर्वनियोजित होता, "फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु असलेल्या शिबिरावेळीही अभाविपनं असाच त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. आम्ही त्यावेळी वाद चिघळू दिला नाही. मात्र यावेळी ते पूर्ण तयारीने आले होते. त्यांनी आम्हाला आधी नको नको ते प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यानंतर आमच्याकडे आम्हाला मिळालेली परवानगी मागितली. आम्ही ती त्यांना दाखवायला नकार दिला आणि त्यांनी आमचा टेबल फेकून दिला आणि आम्हाला हाणामारी सुरु केली. त्यात आमच्या तीन कार्यकर्त्यांना दुखापत झाली आणि एका मुलीलाही मारहाण करण्यात आली."

एसएफआयचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनाही या घटनेत दुखापत झाली. त्यांना लक्ष करून मारण्यात आलं असल्याचा आरोप एसएफआयनं केला आहे. तर अस्मिता या एसएफआयच्या कार्यकर्तीला हाताला दुखापत झाली आहे. दोघांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलं आहे.

भुसनर यांनी केलेल्या आरोपांनुसार एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी झेंड्याला असलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉड काढून हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात एबीव्हीपीच्या एका कार्यकर्त्याला डोक्याला दुखापत झाली असून त्याला टाके लागले असल्याचं त्यानं सांगितलं. 'असे हल्ले आणि आरोप करण्याची एसएफआयची जुनी प्रवृत्ती आहे,' असं ते म्हणाले.

चतुशृंगी पोलिसांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. सध्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली जात आहे. मात्र अद्याप कोणाचीही तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही.