Quick Reads

फोटॉन : खजाना विहीर

फोटोमागच्या कथा, व्यक्ती आणि अवकाश

Credit : इंद्रजीत उगले

बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी, बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात 'बीड' हे शहर वसलेलं आहे. एखाद्या बिळासारखाच हा भाग असल्यामुळे ‘बीळ’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन 'बीड' हे नाव पडलं असावं, असं सांगितलं जातं. पूर्वी या शहराचं एक नाव चंपावतीनगर असंही होतं. चालुक्यकालीन चंपावतीराणीनं या भागावर राज्य केलं असल्याचा उल्लेख पुराणांत सापडतो. तिच्या किल्ल्याच्या काही खाणाखुणा अजूनही शहरात बघायला मिळतात. लहानपणीपासून शहराबद्दलच्या मी अशा बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहे.

mazaar फोटो - इंद्रजीत उगले


पाण्याने वेढलेले कंकालेश्वर मंदीर, डोंगरावरच्या दिपमाळा, प्राचीन खंडेश्वरीचं मंदीर, मन्सूरशाह आणि शहेनशाह वली यांचे दर्गे ही शहरातली ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पण या ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास विचारायचा झाला तर चार ओळींच्या पुढे तो कुणाला सांगता येत नाही. कारण कुणाला तो फारसा माहीतच नाही. फक्त जायचं, बघायचं, फिरायचं आणि निघून यायचं. ते का आहे, कधीपासून आहे याचं कुणालाच काही पडलेलं नाही. गेल्या दीडेक वर्षांपासून मी माझ्या शहराचा इतिहास, त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथल्या जुन्या वास्तू, गल्ल्या बघत मी फिरतो आहे. या दरम्यान बऱ्याच नवीन गोष्टी माझ्या पुढे आल्या.


शहरापासून जवळच ४ किमीच्या अंतरावर 'खजाना बावडी' नावाची एक प्राचीन विहीर आहे. त्या विहीरीत फक्त चार फूट इतकंच पाणी असतं. आणि ते कधीच कमी-जास्त होत नाही असं म्हणतात.

 

खजाना
फोटो - इंद्रजीत उगले


सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.


जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मी. आहे. जमीनीपासून ४.७ मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. आणि त्या खाली विहीराचा मूख्य व्यास १२.६० मी. एवढा आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही.

बोगदाफोटो - इंद्रजीत उगले


या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.

 


khajan2

फोटो - इंद्रजीत उगले


विहिरीतून जाणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याला हवा पुरवठ्यासाठी या कालव्यावर अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात 'झडपा' बांधलेल्या आहेत. ह्या एखाद्या छोट्या आडासारख्या दिसतात. त्यांची खोली १५ फूट ते १६.५ फूट इतकी तर त्यांचा व्यास २ फूट इतका आहे. यात उतरायचीही व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकं यातून पोहत पलीकडे निघायची. आजही या पाण्याचा प्रवाह कायम आहे. यातून येणारं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अडीच कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर अशा एकूण ५३ झडपा आहेत. हे सगळं पाणी भूमिगत म्हणजे जमिनीच्या खालून जवळपास ३ किमी पर्यंत कालव्याने शेताला पोचवण्याचं तंत्रज्ञान आश्चर्यचकीत करणारं आहे !

झडप

फोटो - इंद्रजीत उगले


पण आज ही वैभवसंपन्न विहीर एका मोठ्या संकटात सापडली आहे. विहीर बघायला येणारे पर्यटक बिलकूलच स्वच्छता बाळगत नाहीत. विहिरीच्या पाण्यात बॉटल्स, कचरा वगैरे साचत आहे. विहिरीपर्यंत जायला पक्का रस्ता नाही. यावरून सरकारचं या जलवास्तूबद्दलचं दूर्लक्ष दिसून येतं. विहिरीला तातडीने संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. शिवाय दुष्काळामुळे विहिरीची सिंचन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या कन्स्ट्रकशन्समुळे ह्या कालव्याच्या झडपा बुजत आहेत. शहराजवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे ह्या कालव्याचं शेवटचं टोक 'फुटका नळ'ही उध्वस्त केला असून पुढे शेताला जाणारं पाणी नदीत वळवलं आहे. याने विहीराचं आणि शेतीचं नुकसानच झालं आहे.


हे जर असंच सुरू राहिलं तर लवकरच या विहीरचं अस्तित्व धोक्यात येऊन हे सगळं नष्ट होण्याची शक्यता आहे.