India

आंबेडकरवादी २.०

आंबेडकरवादी चळवळीचा विस्तार रुंदावतोय

Credit : सुरज वाघमारे

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हंटलं की चैत्यभूमीची ओढ लागते. तिथे मिळणारी ऊर्जा आणि तिथे होणारी वैचारिक चर्चा ह्या  माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतात, पण ह्या वर्षी चैत्यभूमीला भेट देऊन परत येत असताना विचारांच्या वादळात एक नवी गोष्ट सापडली ती म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकरवादी २.०. यात आंबेडकरवादी म्हणजे फक्त बौद्ध हा विचार मनात आला असेल तर तुम्हाला चैत्यभूमीला भेट देण्याची नितांत गरज आहे. कारण आंबेडकर २.० ने सर्वाना आता आपल्यात सामावून घेतलं आहे आणि बाबासाहेबांना हवा असलेला नवा समाज घडताना दिसत आहे. 


आपल्या राजकीय स्वार्थासाठी आंबेडकर म्हणजे फक्त दलित उद्धारक ही प्रतिमा तयार करणाऱ्यांना आता जागं व्हावं लागेल, कारण आंबेडकर २.० ज्यांना या नव तरुणाईने उभे केले आहे त्यांनी बाबासाहेब हे जाती निर्मूलना पर्यंतच नाहीत वाचले, त्यांनी आता बाबासाहेबांच्या साऱ्या पैलूंना पाहण्याची दृष्टी मिळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. कालपर्यंत Reserve Bank of India म्हणजे काय माहित नसलेली आपली जनता त्या बँकेचा कारभार कसा चालतो आणि त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या बाबासाहेबांच्या योगदानाची चर्चा करत कृतज्ञता दाखवत आहे. बाबासाहेब म्हणजे फक्त 'चवदार तळ्याचा सत्याग्रह' ह्या समीकरणाला छेद देत बाबासाहेब म्हणजे "हिंदू कोड बिल", बाबासाहेब म्हणजे "नदी जोड प्रकल्प", बाबासाहेब म्हणजे "कामगार नेते", बाबासाहेब म्हणजे "अर्थतज्ञ" अश्या एक ना अनेक गोष्टींचा विचार करून बाबासाहेब म्हणजे 'सर्वसमावेशकता' हे नवीन समीकरण उदयास ही पिढी आणत आहे आणि हे सगळं होत असताना बाबासाहेबांना देवत्व न देता त्यांना आपला बाप म्हणूनच जवळ करत आहे हे पाहून अजून आनंद होतो. 

 

हे सगळं घडत असताना बाबासाहेबांचे अनुयायी बदलत नसतील तर विशेष या प्रक्रियेतून त्यांनीही कात टाकून नवीन रूप घेतलं आहे. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे फक्त दुःखाचा दिवस न राहता तो प्रबोधनाचा दिवस कसा बनेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं आहे. प्रबोधनाची गाणी गात एकमेकांना ऊर्जा देत उभी असणारी तरुणाई, पुस्तकाच्या स्टॉल ला रांगा लावलेली पुस्तकवेडी जनता, पायी चालत ऊन वाऱ्याची पर्वा न करता प्रवासातून थकून ही चेहऱ्यावर हसू असलेले अनुयायी हे चित्र म्हणजे महापरिनिर्वाण दिन. पण ह्या सगळ्यांना नवीन आयाम जोडणारी तरुणाई आंबेडकरवादाचे नवीन रूप सादर करत आहे. दरवर्षी होणाऱ्या गाण्याच्या आवाजाला कोणीही विरोध न करता स्वयंप्रेरणेतून त्यावरती नियंत्रण आणण्याचे काम ही याच तरुणांनी करून दाखवले आहे. चैत्यभूमीवर येणाऱ्या बांधवाना आरोग्य सुविधा मिळाव्या, स्त्रियांना सॅनिटरी पॅड्स मिळावे यासाठी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता डॉक्टर मंडळी जीवाचे रान करून प्रत्येकापर्यंत पोहचत आहे. दरवर्षी कचरा ही खूप मोठी समस्या आहे असं दाखवून होत असलेल्या टीकेला "सरकार जबाबदार आहे" असे उत्तर देऊन जबाबदारी झटकू शकणारी तरुण मंडळी ३ दिवस चैत्यभूमीवरील कचरा साफ करून अनोख्या पद्धतीने प्रशासनाला जाब विचारत आहे. "एक वही एक पेन" या अनोख्या अभिवादनाने शालेय साहित्य गोळा करून ही मंडळी खेड्यापर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहचवत आहेत ह्या अश्या एक ना अनेक गोष्टीतून साकारत आहेत 

ह्या सगळ्यात तरुणचं भाग घेत आहेत असं मी म्हणत नाही यात जेष्ठ मंडळी सुद्धा तितक्याच हिरिरीने सहभागी होत आहेत.  हे चित्र पाहून नक्कीच मागील काही दिवसात मनात खोलवर रुतत चाललेली निराशेची छाया एका झटक्यात उडून गेली आहे आणि आता एका नव्या आशेने जन्म घेतला आहे ती म्हणजे, आंबेडकर आणि आंबेडकरवादी २. ०..!"